केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान १९ मार्चला अमळनेरात मंगळग्रह मंदिरातून राष्ट्रीय ‘भूमी सुपोषण’ जनजागरण अभियानाचा शुभारंभ..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : देशातील शेतीच्या जमिनीत कार्बन पातळी सातत्याने घटत असून त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भूमीचे संरक्षण व सुपोषण व्हावे, यासाठी २०२१ पासून राष्ट्रीय स्तरावर सामाजिक जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. कृषी व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सामाजिक व धार्मिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून या अभियानाला देशभर प्रतिसाद मिळत असून हजारो गावांमध्ये भूमिपूजन व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होत आहे. रासायनिकमुक्त व शाश्वत शेतीकडे शेतकरी वळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
याच अभियानाचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, १९ मार्च २०२६ रोजी अमळनेर येथून होणार आहे. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भूमी मातेचा जन्मदिवस मानला जातो. या औचित्याने या पवित्र उपक्रमाचा प्रारंभ अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरातून होणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कृषी, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. १९ मार्च रोजी संपूर्ण देशात समाजाच्या सहभागातून हे अभियान एकाच वेळी राबविले जाणार आहे.
कृषी व पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे की, शेतीच्या जमिनीचा भौतिक, रासायनिक व जैविक समतोल बिघडत चालला आहे. जमिनीत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे येत्या काळात उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भूमीतील जैविक कार्बन आवश्यकतेपेक्षा खूपच कमी झाल्याने देशहित व शेतकरी हित लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी ‘भूमी सुपोषण’ या माध्यमातून सकारात्मक बदलाचे बीज रोवले आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील ३० हजार गावांमध्ये व ५४ हजार शहरी ठिकाणी भूमिपूजन व जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहेत.
या अभियानात देशातील विविध सामाजिक व धार्मिक संस्था, हजारो गोशाळा, स्वयंसेवी संस्था, सर्व कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग अपेक्षित आहे. अभियानांतर्गत भूमिपूजन, भूमी सुपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, प्रात्यक्षिके व प्रशिक्षण, संगोष्ठी, कार्यशाळा, जनजागृती शिबिरे, प्रदर्शने यांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरी भागांमध्ये जैविक व अजैविक कचऱ्याचे विभाजन, जैविक कचऱ्यापासून खतनिर्मिती यांसारख्या उपक्रमांवरही भर देण्यात येणार आहे. भूमी सुपोषणाशी संबंधित साहित्य www.bhumisuposhan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अमळनेर येथील कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री ना. चौहान यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य तथा सहकार्यवाह भागैय्याजी, कनेरी मठाचे गादीपती परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अभियानाच्या संचालनात राष्ट्रीय संयोजक पद्मश्री कृषक सुभाषजी शर्मा, संयोजक श्री नवलजी रघुवंशी (इंदूर) व सहसंयोजक श्री आलोकजी गुप्ता (दिल्ली) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

“श्री मंगळग्रह मंदिरात दाक्षिणात्य शैलीतील विश्वातील एकमेव श्री भूमी मातेची मूर्ती आहे. मातेच्या जन्मदिवशी या पवित्र स्थळावरून ‘भूमी सुपोषण’ या राष्ट्रीय जनजागरण अभियानाचा प्रारंभ होणे हे आमचे सौभाग्य आहे. या निमित्ताने देशभरातून हजारो शेतकरी अमळनेरला येतील. ते आपल्या शेतातील एक मूठ माती सोबत आणतील. त्या मातीचे सामूहिक पूजन करून ती पूजित माती गावोगावी वाटप केली जाईल. भूमी सुपोषणाच्या माध्यमातून देश सुजलाम्–सुफलाम् करण्याचा हा संकल्प आहे. हा उपक्रम जिल्हा, खानदेश वासीयांसाठी अभिमानास्पद असून यशस्वीतेसाठी लवकरच तज्ज्ञांच्या नियोजनात्मक बैठका घेतल्या जातील.”
— डॉ. डिगंबर महाले, अध्यक्ष, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 169000
22 Ct सोने 91.60% : ₹. 155500
18 Ct सोने 75.00% : ₹. 128500
शुद्ध चांदी 999%:₹. 3450/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
