कर्जाच्या ओझ्याला कंटाळून खेडीतील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गावात शोककळा.

0

अमळनेर/ आबिद शेख 


कळमसरे ता. अमळनेर
अमळनेर तालुक्यातील खेडी येथे कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २७) उघडकीस आली. श्याम सुनील पाटील (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, श्याम पाटील यांच्याकडे सुमारे दीड एकर शेती होती. शेतीसाठी घेतलेल्या सुमारे तीन लाख रुपयांच्या सावकारी कर्जाचा मोठा बोजा त्यांच्या डोक्यावर होता. यंदाच्या खरीप हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता नसल्याने ते मानसिक तणावात होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची गावात चर्चा आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
श्याम हे शनिवारी (दि. २६) रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
शवविच्छेदनानंतर दुपारी सुमारे अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
श्याम पाटील यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वडील सुनील विनायक पाटील यांचा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा ठरला. या घटनेमुळे खेडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed