स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट गणेश भामरे यांच्या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उभारी.

0

अमळनेर /आबिद शेख 


माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. पोलीस पाटील तथा अमळनेर तालुका शेतकी संघाचे व्हाइस चेअरमन गणेश भामरे यांच्या पुढाकारातून २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी शेतकी संघाचे चेअरमन संभाजी पाटील आणि गणेश भामरे यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गणेश भामरे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची आठवण करून दिली. विशेषतः पाडळसरे धरणासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करत, समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.
अध्यक्षीय समारोपात शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रभावी प्रशासनशैली, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्याचा उल्लेख केला. त्यांचे कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर गणेश भामरे यांच्या हस्ते २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास खांजोडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन अहिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निखिल पाटील, कृष्णा कोळी, सागर पवार, प्रसाद बुवा, जयश्री पाटील आणि नम्रता दोरकर यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी गणेश भामरे म्हणाले की, “गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलवणारा गणवेश हा केवळ पोशाख नसून शिक्षणाची नवी उमेद आहे. आमचे नेते व मार्गदर्शक माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून स्वर्गीय अजितदादा पवार यांना ही खरी आदरांजली अर्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या उपक्रमामुळे शिक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed