अमळनेर तालुक्यात डेंग्यू-मलेरियाविरोधात आरोग्य विभाग सज्ज; सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोफत रक्त तपासणी सुविधा.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अमळनेर तालुका आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यू व मलेरियाच्या निदानासाठी मोफत रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी केले आहे.

सध्या पावसाळ्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढत आहे. डेंग्यू झाल्यास रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत निदान व उपचार न झाल्यास प्रकृती गंभीर होऊ शकते.
तसेच शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या आणि तेथून परतणाऱ्या नागरिकांमुळेही संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे किंवा इतर लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
खासगी प्रयोगशाळांमध्ये डेंग्यू व मलेरियाच्या रक्त तपासणीसाठी खर्च येत असल्याने अनेक नागरिक तपासणी टाळतात. त्यामुळे आजाराचे वेळेवर निदान होत नाही आणि संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुमारे १,५०० रक्त तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोफत व त्वरित तपासणीची सुविधा मिळणार आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि तापाची लक्षणे दिसताच तातडीने शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून उपलब्ध मोफत तपासणी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी केले आहे
