अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वाचा प्रश्न; उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत..

0
New-Doc-01-30-2026-07.52.jpg


24 प्राईम न्यूज 30 Jan 2026
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते दिवंगत अजित पवार अनंतात विलीन होताच पक्षात नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर पक्षाची धुरा कोणाकडे सोपवायची, तसेच सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद आणि वित्त व नियोजनसारखी महत्त्वाची खाती कोण सांभाळणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी गुरुवारी खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदासाठी तसेच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनाने पक्षातील खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सरकारदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः वित्त आणि नियोजन हे महत्त्वाचे खाते कोणाकडे द्यायचे, यावरही राष्ट्रवादीत सध्या खल सुरू आहे.
पक्षाच्या नेतृत्वासाठी सुनेत्रा पवार यांना साकडे घालण्यात आल्याचे समजते. मात्र, त्या राजकारणात तुलनेने नवख्या आहेत. जरी त्या राज्यसभा सदस्या असल्या, तरी प्रशासकीय आणि संघटनात्मक अनुभव कमी असल्याचे मत काही नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणे आणि त्याच वेळी पक्षाची संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांभाळणे हे आव्हानात्मक ठरणार असल्याचीही चर्चा आहे.
जर सुनेत्रा पवार यांनी असमर्थता दर्शवली, तर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार अशी दोन नावे चर्चेत आहेत. यापैकी पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी पडद्यामागून पक्षासाठी काम करत निवडणूक प्रचारातही सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र, तरीही पार्थ पवार यांच्याकडे तात्काळ पक्षाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
याशिवाय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही पर्याय पक्षासमोर आहेत. राष्ट्रवादीकडे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफ यांसारखे अनुभवी मंत्रीही आहेत. वळसे-पाटील यांनी यापूर्वी वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून काम केले असले, तरी सध्या त्यांची प्रकृती साथ देत नसल्याची चर्चा आहे. तसेच भुजबळ आणि मुश्रीफ यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी देणे कितपत योग्य ठरेल, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
एकूणच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर नेतृत्वाचा पेच निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणाऱ्या चर्चेनंतरच पक्षाच्या नेतृत्वाबाबत आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 185000

22 Ct सोने 91.60% : ₹. 170200

18 Ct सोने 75.00% : ₹. 140600

शुद्ध चांदी 999%:₹. 4020/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed