जामनेर मॉबलिंचिंग प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी..
दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे लव जिहादच्या नावाखाली २० वर्षीय सुलेमान खान या तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली. या घटनेचा मुस्लिम सेवा संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुस्लिम सेवा संघाने नायब तहसीलदार राजेश घोलप यांना निवेदन सादर केले. घटनेतील मास्टरमाईंड आरोपी अद्याप फरार असून, गावात जाऊन हल्ला करणारे आरोपी मोकाट फिरत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात हेट स्पीचवर कठोर निर्बंध आणले नाहीत तर दोन समाजात तेढ वाढून अशा घटना पुन्हा घडू शकतात, अशी भीती संघटनेने व्यक्त केली.
संघटनेने निवेदनातून दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.
या वेळी मुस्लिम सेवा संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष मंजुम पठाण, एमआयएम तालुकाध्यक्ष जुबेर शेख, इरफान सैय्यद, आदिल शेख, निसार पठवा, अश्फाक पठवा, अजु कुरैशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
