देशमुख नगरात रस्ते, दूषित पाणी, प्रकाशाचा बोजवारा ; तक्रारी करूनही नगरपरिषदेचे दुर्लक्ष, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.
अमळनेर आबिद शेख

अमळनेर पिंपळे रोड व ढेकू रोड दरम्यान असलेल्या देशमुख नगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भुयारी गटार योजनेसाठी परिसरातील डांबरी रस्ता खोदण्यात आला होता. पाईप टाकण्याचे काम पूर्ण होऊन महिने उलटले तरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने धोका अधिक वाढला आहे.

केवळ रस्ताच नव्हे, तर येथे दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. नियमित घरपट्टी, पाणीपट्टी व कर भरूनही सुविधा मिळत नसल्याने नाराजी आहे. या भागात अनेक दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक राहत असून त्यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नगरसेवक, नगरपरिषद कार्यालय व ऑनलाइन तक्रार प्रणालीवर वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, स्वच्छ पाण्याचा 6नियमित पुरवठा करावा आणि प्रकाशव्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा नगरपरिषदेवर येऊन आंदोलन करू, असा इशारा देशमुख नगरातील नागरिकांनी दिला आहे.

