अमळनेर नगरपरिषदेची अतिक्रमणांवर कारवाई; भूखंड क्रमांक २१ मधील टपऱ्या हटविल्या जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात; स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास पालिकेकडून कारवाईचा इशारा.

0

अमळनेर/आबीद शेख


अमळनेर  : शहरातील भूखंड क्रमांक २१ मधील अतिक्रमणे हटविण्यास नगरपरिषदेने सुरुवात केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने सुमारे दहा टपऱ्या हटविण्यात आल्या असून, पक्के बांधकाम, दुकाने आणि शेडधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नगरपरिषदेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, गेल्या चार दिवसांपासून दुकानदार आणि टपरीधारकांना तोंडी सूचना दिल्या जात होत्या. मात्र, अतिक्रमणे काढण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर पालिकेने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली.


कारवाईदरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधितांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारवाई सुरू असताना एका व्यक्तीने पालिका कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाने ही मोहीम सुरू केली आहे. या पथकात अविनाश बिन्हाडे, चंदर बिन्हाडे, राज रामराजे, जितेंद्र चानोरिया, दर्शन बिन्हाडे, सुनील संघिले, विकास बिन्हाडे तसेच विशाल सपकाळे यांचा समावेश असल्याचे समजते.
पालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून न घेतल्यास नगरपरिषदेकडून ती हटविण्यात येतील. या कारवाईदरम्यान होणाऱ्या नुकसानीस संबंधित अतिक्रमणधारक स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed