पातोंडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच दुकाने फोडली, रोकड आणि लॅपटॉप लंपास पातोंडा, मठगव्हाणमध्ये चोरट्यांचा हैदोस; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, पोलिसांच्या उशिरा पोहोचण्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा आणि मठगव्हाण परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मंगळवारी मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल पाच दुकाने फोडली. या घटनेत विविध दुकानांमधील रोकड आणि एक लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला. पातोंडा येथील मशिदीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटारसायकलवरून आलेले तीन संशयित कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे मोटारसायकलवरून पातोंडा गावात दाखल झाले. सुरुवातीला दत्त मंदिराजवळील भरत सोनार यांच्या ओम साई ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानाचे सेंट्रल लॉक तोडण्यात अपयश आल्याने चोरट्यांनी मोर्चा श्री मेडिकलकडे वळवला. रमाकांत पाटील यांच्या या मेडिकलमधून दोन ते तीन दिवसांच्या गल्ल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरीला गेला.
त्यानंतर ग्रामपंचायत शॉपिंगमधील चंदू सूर्यवंशी यांच्या लक्ष्मीसदा कृषी केंद्रातून पाच हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी पातोंड्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील मठगव्हाण फाट्यावर धाव घेतली. तेथील नाना कोळी यांच्या हॉटेलमधून दोन हजार रुपये, तर समोरच असलेल्या जितू कोळी यांच्या कृषी केंद्रातून पाच हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच परिसरातील शेतांमधून विहिरी व बोअरवेलच्या केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या. आता चोरट्यांनी थेट गावातील दुकानांना लक्ष्य केल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती देऊनही पोलीस दुपारी पोहोचले!
बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, सकाळी आठ वाजता घटनेची माहिती देऊनही पोलीस दुपारी दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. पोलिसांच्या या विलंबामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित दुकानदारांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
पातोंडा गावात सार्वजनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी
पातोंडा हे परिसरातील मोठे गाव असून, आजूबाजूच्या अनेक खेड्यांमधील नागरिक बाजारपेठेसाठी येथे येत असतात. मात्र, गावातील प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत चौक, दत्त मंदिर, बसस्थानक, जुने पोलीस स्टेशन आणि मराठी शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास आणि गुन्हेगारांचा माग काढण्यास मदत होऊ शकते.

