गोवंश हत्येच्या घटनांविरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक; २७ नोव्हेंबरला जनआक्रोश आंदोलनासह बेमुदत उपोषण कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी; तिरंगा चौक ते नगरपालिका मोर्चा काढणार, नगरपालिका आवारात अन्नत्याग आंदोलन.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेला कत्तलखाना, शहर व तालुक्यात घडणाऱ्या कथित गोवंश हत्येच्या घटना तसेच शेतकऱ्यांचे गोवंश चोरीला जाण्याच्या प्रकारांविरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन आणि त्यानंतर बेमुदत आमरण उपोषण (अन्नत्याग) करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने निवेदनाद्वारे दिली आहे.

या आंदोलनाची पूर्वसूचना अमळनेर पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता तिरंगा चौक येथून जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात होणार असून, हा मोर्चा अमळनेर नगरपालिकेपर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर नगरपालिका आवारात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
अमळनेर नगरपालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून जमीनदोस्त करावा, कत्तलखाना चालविणाऱ्या संबंधित परवानाधारकांची व दोषी व्यक्तींची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच गोवंश हत्येच्या प्रकरणांतील मुख्य आरोपी आणि संघटित गुन्हेगारीत सहभागी असल्याचे पुरावे असलेल्या व्यक्तींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कत्तलखान्याच्या कामकाजात निष्काळजीपणा अथवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित नगरपालिका कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर निलंबनासह प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय शहर व तालुक्यातील गोवंश हत्येच्या घटनांना आळा घालावा, शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले गोवंश शोधण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करावे आणि गोवंश चोरीच्या घटनांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
प्रशासनाने केवळ आश्वासने न देता संबंधित मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कारवाई करावी, या भूमिकेतून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

