अमळनेरात आज कत्तलखाना बंदच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा; नगरपालिकेत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा.

0

 

अमळनेर | आबिद शेख

अमळनेर नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेला कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो जमीनदोस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आज शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी अमळनेरात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर नगरपालिकेच्या आवारात बेमुदत आमरण उपोषणालाही सुरुवात करण्यात येणार असल्याने प्रशासनाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.

या आंदोलनासंदर्भात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. आज सकाळी १० वाजता तिरंगा चौक येथून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार असून, हा मोर्चा नगरपालिकेवर धडकणार आहे. त्यानंतर नगरपालिका आवारात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अमळनेरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून जमीनदोस्त करणे, परवानाधारक व दोषींवर कठोर कारवाई करणे, गोवंश हत्येच्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणे, दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच शेतकऱ्यांच्या गोवंश चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करणे या मागण्यांचा समावेश आहे.

प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा न करता संबंधित मागण्यांवर ठोस आणि प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी भूमिका विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने घेतली आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed