अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत घरफोड्या जेरबंद! तीन घरफोड्यांचा छडा; सोन्या-चांदीचे दागिने, गणपती मूर्ती आणि रोकड जप्त.

0

अमळनेर/आबीद शेख
अमळनेर, दि. १२ ऑक्टोबर : अमळनेर शहरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


पोलीस तपासात केर उर्फ केहर इडिया डाबर (वय ४५, रा. बलेडी गलवेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) याचे नाव निष्पन्न झाले. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अमळनेर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केले आहे.
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री अमळनेर शहराबाहेरील शेतांमध्ये बांधलेल्या मोटार सायकल शेडजवळील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते. त्यानंतर दि. ३ एप्रिल २०२६ रोजी शहरातील एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले. तसेच दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सिमेंट क्राँक्रीट रोडजवळील बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातून रोख रक्कम, चांदीची गणपती मूर्ती, लक्ष्मीची नक्षीकाम केलेली गोल सिक्का आदी वस्तू चोरी करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.Writing
चोरीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक ४४६/२०२६ मधील ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती आणि २० ग्रॅम वजनाचे चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे जप्त करण्यात आले.
गुन्हा क्रमांक ३२/२०२६ मध्ये ५ ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा तुकडा आणि १४ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे हस्तगत करण्यात आले. तसेच गुन्हा क्रमांक १५९/२०२६ मध्ये ५ ग्रॅम व १ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन करदोडे, २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन जोड वाळे आणि १८ ग्रॅम वजनाचे चांदीचे चार कडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांचा तपास पुढे सरकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed