वडिलांच्या शैक्षणिक आठवणींना उजाळा; चैनसुखजी संचेती यांची प्रताप हायस्कूलला भेट साने गुरुजींच्या सानिध्यात वडिलांनी घेतलेल्या शिक्षणाच्या आठवणींना दिला उजाळा; जुन्या प्रवेश नोंदींची केली पाहणी.

0


अमळनेर, : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व प्रताप हायस्कूलला माजी आमदार तथा नीतीमूल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष चैनसुखजी संचेती यांनी भेट दिली. त्यांचे वडील स्व. मदनलालजी नथमलजी संचेती यांनी याच शाळेत शिक्षण घेतले असल्याने शाळेच्या परिसरात येताच त्यांनी वडिलांच्या बालपणीच्या शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला.
संचेती यांनी प्रथम प्रताप महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर प्रताप हायस्कूलमध्ये जाऊन वडिलांच्या शिक्षणाशी संबंधित जुन्या आठवणी सांगितल्या. साने गुरुजींच्या सानिध्यात वडिलांना मिळालेले शैक्षणिक संस्कार, त्या काळातील वातावरण तसेच विविध व्यक्तींशी संबंधित आठवणी त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.


यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शालेय प्रवेशापासून नागपूरमधील विद्यार्थी जीवनातील आठवणी, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विवाहाची जबाबदारी सोपविल्याची आठवण, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासोबत वडिलांनी केलेले कार्य तसेच भगवद्गीता आणि तिच्या अर्थाविषयीही माहिती दिली.
यानंतर संचेती यांनी आपल्या वडिलांच्या शाळेतील प्रवेशासंदर्भातील कागदपत्रे मिळविण्यासाठी स्वतः अर्ज केला. जुन्या रजिस्टरमध्ये त्यांच्या प्रवेशावेळी करण्यात आलेल्या नोंदींची त्यांनी पाहणी केली. शाळेने जतन करून ठेवलेल्या जुन्या रजिस्टर व ऐतिहासिक कागदपत्रांचे त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर त्यांनी प्रताप हायस्कूल परिसरातील साने गुरुजी स्मारकाला भेट दिली. सुमारे एक तास स्मारक परिसरात वेळ घालवत त्यांनी साने गुरुजींच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेच्या विविध ठिकाणी त्यांनी छायाचित्रेही काढली.
वडिलांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेत येऊन त्यांच्या जुन्या शैक्षणिक नोंदी प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव चैनसुखजी संचेती यांच्यासाठी भावनिक ठरला.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ, खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन सी.ए. नीरज अग्रवाल, व्हाईस चेअरमन जितेंद्र जैन, संचालक प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, रीता बाविस्कर, सहचिटणीस विजय मांटे, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, करुणा शिक्षक डी.एन. पालवे, एस.एस. खांजोडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed