अमळनेरच्या प्रभाग १२ आणि १३ मध्ये समस्यांचा विळखा; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त! स्ट्रीट लाईट बंद, गटारींची साफसफाई नाही; तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप.

0

अमळनेर/आबीद शेख
अमळनेर : अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १२ आणि १३ मध्ये विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, बंद पडलेले स्ट्रीट लाईट, गटारींमध्ये साचलेली घाण आणि नियमित साफसफाईचा अभाव यामुळे परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत संबंधित नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये नगरसेवक सुरेश नाना सोनार आणि पुष्पा भोई, तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरसेवक अनिल गंगाराम महाजन आणि सीमाताई हे प्रतिनिधित्व करीत असल्याचे नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दोन्ही प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. तसेच गटारींमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्यांबाबत चारही नगरसेवकांना माहिती देऊनही ठोस कार्यवाही होत नाही. काही वेळा उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा, तसेच नागरिकांशी उद्धटपणे बोलले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. समस्या सोडविण्याऐवजी नगरपरिषदेकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जात असून, स्ट्रीट लाईटच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याची बाब समोर येत आहे. परिसरातील आर. के. नगरपासून बहादरपूर नाक्यापर्यंतचा मोठा भाग एका वायरमनच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे सांगण्यात आले. स्ट्रीट लाईट सुरू करणे व दुरुस्ती करणे हे नगरपरिषदेच्या संबंधित विभागाचे काम असल्याचे सांगूनही प्रत्यक्षात कामे वेळेवर होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
प्रभागातील मूलभूत नागरी सुविधांकडे तातडीने लक्ष देऊन बंद पथदिवे सुरू करावेत, गटारींची नियमित साफसफाई करावी आणि नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. आता नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी या समस्यांवर कोणती कार्यवाही करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed