अमळनेरमध्ये बेकायदेशीर कत्तलखान्यावर अखेर पालिकेचा हातोडा! हिंदू संघटनांच्या तीव्र विरोधानंतर कत्तलखाना सील; सुमारे ४०० किलो मांस जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरात गोवंश कत्तलीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने अखेर संबंधित कत्तलखान्यावर कारवाई करत तो सील केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी छापा टाकून गोवंश कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच कत्तल केलेल्या जनावरांचे मांस, कातडी व शिंगे जप्त केली होती. सुमारे ४०० किलो मांस जप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

या घटनेनंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेला निवेदन दिले होते. संबंधित कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो जमीनदोस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत संघटनांनी आठ दिवसांचा अल्टिमेटमही दिला होता.

शहरातील धार्मिक वातावरण बिघडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी नगरसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नियमांचे उल्लंघन आणि पुढील संभाव्य कठोर कारवाई लक्षात घेता तातडीने कत्तलखाना सील करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यानुसार प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश दिले. आरोग्य निरीक्षक संतोष बिन्हाडे, संतोष जाधव, किरण कंडारे, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, मयूर पाटील, नम्रता जरे, योगेश पवार, परम चव्हाण, रिजवान शेख, सलीम, अनंत संदानशिव आदी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेत कत्तलखाना सील केला.

या कारवाईमुळे हिंदू संघटनांच्या मागणीला अखेर प्रशासनाने प्रतिसाद दिला असून, संबंधित कत्तलखान्याबाबत पालिका पुढे कोणती भूमिका घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed