दिव्यांगांच्या मानधनात वाढीसाठी प्रहार संघटना आक्रमक; दरमहा ६ हजार रुपये देण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांना १२ मागण्यांचे निवेदन; विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे साकडे.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना मिळणारे मासिक मानधन अपुरे पडत असल्याने ते २ हजार ५०० रुपयांवरून थेट ६ हजार रुपये करण्यात यावे, अशी जोरदार मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेने केली आहे. यासह दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिलदादा पाटील यांची भेट घेऊन १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.

दिव्यांगांना दैनंदिन जीवन जगताना अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधोपचार, अन्नधान्य, प्रवास तसेच इतर जीवनावश्यक खर्च भागविणे कठीण होत असून, रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक दिव्यांगांना आर्थिक विवंचनेत दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे शासनाने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.
मानधनवाढीसोबतच बेरोजगार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणे, शासकीय सेवांमधील रिक्त राखीव पदे तातडीने भरणे, स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी अथवा सवलतीच्या व्याजदराने कर्ज देणे आणि घरकुल योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, लॅपटॉप आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आरोग्य सुविधांच्या बाबतीत शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, औषधोपचार तसेच कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल आणि श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यावर संघटनेने भर दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करावा, एसटी आणि रेल्वे प्रवास सवलतींचा लाभ सुलभ करावा आणि दिव्यांग महिलांसाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी, तालुकास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा, पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि अंत्योदय योजनांचा प्राधान्याने लाभ तसेच शासकीय समित्यांमध्ये दिव्यांग संघटनांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आमदार अनिलदादा पाटील यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न ठामपणे मांडून मासिक मानधन ६ हजार रुपये करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
‘दिव्यांगांना दया नको, हक्क हवा; आश्वासन नको, प्रत्यक्ष न्याय हवा!’ या घोषणेतून संघटनेने आपल्या मागण्यांची तीव्रता व्यक्त केली.
यावेळी करीम बागवान, फारुक शेख, बिरजू पेपरसी, नूरखान, अमोल मराठे, कलीम शेख, मंजू ताई, आबा दशमुख, सविता ताई, सलमा बागवान आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

