एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला-बालकांच्या पुनर्वसनातील कार्याची दखल आधार बहुउद्देशीय संस्थेला स्नेहालयचा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’.
अमळनेर/ आबीद शेख

अमळनेर : एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व बालकांचे उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण, तसेच वंचित महिला व बालकांसाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांना स्नेहालय संस्था, अहिल्यानगरतर्फे ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात १९९९ पासून आधार बहुउद्देशीय संस्थेने एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व बालकांसाठी उपचार, समुपदेशन, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरणाचे कार्य सुरू ठेवले आहे. गेल्या २५ वर्षांत जळगाव व धुळे जिल्ह्यातील सुमारे १६ हजार एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसोबत संस्था कार्यरत आहे.
एचआयव्हीबाबत जनजागृती, आईकडून बाळाला होणारा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शन व उपचार, तसेच लैंगिक शोषित व वंचित महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्थेने केले आहे. आधार कार्ड, शिधापत्रिका, मिशन वात्सल्य, बाल संगोपन योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि विमा योजनांचा लाभ मिळवून देतानाच कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह व मानवी तस्करीविरोधातही संस्थेने काम केले आहे.

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी औद्योगिक वसाहतीतील स्नेहालय पुनर्वसन संकुलात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MKCL) मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत प्रमुख संवादक म्हणून उपस्थित होते. नागेबाबा परिवाराचे कडुभाऊ काळे आणि स्नेहालयचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आधार संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. भारती पाटील, पदाधिकारी व कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप ₹५० हजार, सन्मानपत्र आणि पुस्तकांचा संच असे होते.
स्नेहालय संस्थेने आधारच्या कार्याचा गौरव करताना जळगाव जिल्ह्यातील संस्थेचे काम देशासाठी पथदर्शी असल्याचे नमूद केले. संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद व सचिव प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी हा पुरस्कार संस्थेच्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल असून, भविष्यात वंचित महिला, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आणि बालकांच्या हक्क व पुनर्वसनासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
आधार बहुउद्देशीय संस्थेला मिळालेला हा पुरस्कार अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.

