सदा जनसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; टिपू सुलतान व मौलाना आझाद जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा जागर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान राबवून महापुरुषांना अभिवादन.
24 प्राईम न्यूज 
नंदुरबार : स्वातंत्र्यसेनानी हजरत फतेह अली शहीद टिपू सुलतान आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदा जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमांतून महापुरुषांच्या विचारांना उजाळा देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सैय्यद फरत, नगरसेवक रफत सैय्यद, मलक जकरीया, आसिफ पिंजारी, इसामू ठेकेदार आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद मोहसीन उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना एजाज बागवान यांनी टिपू सुलतान यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा उल्लेख केला. ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांनी धैर्याने लढा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त फाऊंडेशनकडून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून त्यांचे स्मरण केले जाते, असे त्यांनी सांगितले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारिता आणि शिक्षणाच्या माध्यमातून आझाद यांनी देशाला नवी दिशा दिली. ‘अल-हिलाल’ आणि ‘अल-बलाग’ या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात जनजागृती केली. त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर निर्बंध घातले आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तरीही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही. देशातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा सन्मान म्हणून ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या दिनानिमित्त अपेक्षित उपक्रम होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
याप्रसंगी सईद बागवान, सुलतान शाह, रफीक ठेकेदार, मोहम्मद बागवान, वसीम बागवान, मोहम्मद युसुफ बागवान, दानिश बागवान, जुबेर खाटीक, आकीब लतिफ, नासीर खाटीक आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाला शेख, फराज शिकलीकर, जाकीर शाह, आवेश मोमीन, मुस्तकीन शाह, अली खाटीक, असरार सैय्यद, साहील बागवान, फय्याज धोबी, अल्पेश शिकलीकर आणि सलाम बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जाकीर दिदार शाह यांनी केले.
