तरुणांनी प्रदर्शनातून उद्योगाच्या नव्या संधी शोधाव्यात : मंत्री संजय सावकारे खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’; पहिल्याच दिवशी चार हजार विद्यार्थी व नागरिकांची भेट.

0

अमळनेर/ आबीद शेख 


अमळनेर, दि. ७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना शेतीसोबतच उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची गरज आहे. याच उद्देशाने खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनातून तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या विविध संधी आणि शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. तरुणांनी या प्रदर्शनातून नवनवीन कल्पना घेऊन स्टार्टअप व उद्योग सुरू करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


कार्यक्रमास रावेरचे आमदार अमोल जावळे, विधान परिषद सदस्य नंदुभाऊ महाजन, खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरजभाऊ अग्रवाल, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सरवर, यंत्रा इंडिया लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरंजन लाल, भाजप मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, भाजप कृषी आघाडीचे श्रीनिवास मोरे, फ्रेंड्स एक्झिबिशनचे चेअरमन आनंद पाल, अखिला श्रीनिवासन, दीपकसिंग मेहता, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कृतिका अप्रे, भारती सोनवणे, डीसीसीच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी चार हजारांची गर्दी
अमळनेर शहरासह पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह सुमारे चार हजार नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन विशेष आकर्षण ठरले.
खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, यापूर्वी जळगाव येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यंदा ग्रामीण भागातील नागरिक आणि तरुणांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, या उद्देशाने अमळनेर येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
शेतकरी कुटुंबाला दोन लाखांचा धनादेश
प्रदर्शनादरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने मंगरूळ येथील दिवंगत शेतकरी बापू साहेबराव पाटील यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सायंकाळी अमळनेर शहरातील व्यापारी आणि एमआयडीसीतील उद्योजकांची खासदार स्मिताताई वाघ यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी उद्योजकांनी उद्योगवाढीतील विविध अडचणी मांडल्या. तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. संबंधित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार वाघ यांनी दिले.
७५ हून अधिक संस्था एकाच छताखाली
‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनात केंद्र व राज्य शासनाच्या ७५ हून अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत. कर्नाटक साबण व डिटर्जंट लिमिटेड, भारतीय पॅकेजिंग संस्था, जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय मानक ब्युरो, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, राष्ट्रीय बीज निगम, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन निगम, यंत्र इंडिया लिमिटेड, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण, डाक विभाग, महाजेनको, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, महावितरण, भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसह विविध केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थांचे स्टॉल प्रदर्शनात आहेत.
यामुळे विद्यार्थी, शेतकरी, तरुण उद्योजक, महिला आणि नागरिकांना शासनाच्या विविध योजना, रोजगाराच्या संधी, उद्योगासाठी उपलब्ध सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed