अमळनेर एसटी आगाराची दिवाळीत ऐतिहासिक कामगिरी; २२ दिवसांत २ कोटी ८ लाखांचे विक्रमी उत्पन्न! जादा बसफेऱ्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९ बसेसच्या माध्यमातून ८ लाख ९४ हजार ८५० किलोमीटरचा प्रवास.

0

अमळनेर /आबिद शेख 

 

अमळनेर  : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी आणि मर्यादित बससंख्या अशा आव्हानात्मक परिस्थितीतही उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर अमळनेर एसटी आगाराने उत्पन्नाचा ऐतिहासिक विक्रम नोंदविला आहे. अवघ्या २२ दिवसांत आगाराने २ कोटी ८ लाख ९४ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, केवळ ९ बसेस उपलब्ध असतानाही जादा बसफेऱ्यांचे काटेकोर नियोजन करून आगाराने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई, सुरत, बारामती, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या लांब पल्ल्याच्या मार्गांसह धुळे, जळगाव, शिरपूर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, नंदुरबार, दोंडाईचा आणि शिंदखेडा या स्थानिक मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध बसेसचा जास्तीत जास्त वापर करून मागणी आणि गरजेनुसार जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले.

या २२ दिवसांच्या कालावधीत अमळनेर आगाराच्या बसेसनी एकूण ८ लाख ९४ हजार ८५० किलोमीटरचा प्रवास केला. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले. शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रवासी सवलतींच्या रकमेसह आगाराचे एकूण उत्पन्न २ कोटी ८ लाख ९४ हजार रुपयांवर पोहोचले. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांनी एसटीच्या लालपरीला दिलेला प्रतिसाद या विक्रमी उत्पन्नातून अधोरेखित झाला आहे.

या यशामागे चालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी तसेच नियोजनात सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सणासुदीच्या काळात स्वतःच्या आनंदापेक्षा प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य देत कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली. मर्यादित बसेस, योग्य नियोजन, जादा फेऱ्या आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील समन्वय यामुळे अमळनेर आगाराला उत्पन्नाचा नवा विक्रम प्रस्थापित करता आला.

याबाबत आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी सांगितले की, “केवळ ९ बसेस उपलब्ध असतानाही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जादा फेऱ्यांचे योग्य नियोजन करता आले. प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी सेवा देणे हे आगाराचे प्रमुख उद्दिष्ट असून भविष्यातही अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून अमळनेर एसटी आगाराने मिळविलेली ही विक्रमी कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आणि प्रवाशांच्या विश्वासाला मिळालेली ही मोठी पावती मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed