वीज दुरुस्तीला गेलेल्या वायरमनचे घर फोडले; ६३ हजारांचे दागिने लंपास.
अमळनेर/आबीद शेख

अमळनेर : शहरातील वीज बिघाड दुरुस्त करण्यासाठी कर्तव्यावर गेलेल्या वायरमनच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी पहाटे घडली. याप्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गलवाडे रस्त्यावरील ताराचंद नगर येथील श्यामकांत पाटील हे पारोळा वीज मंडळात वायरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या चुलत सासऱ्यांचे निधन झाल्याने २९ सप्टेंबर रोजी ते कुटुंबासह घराला कुलूप लावून एरंडोल तालुक्यातील हणमंतखेडे येथे अंत्ययात्रेसाठी गेले होते. रात्री ते अमळनेरातील घरी परतले.

दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमळनेर शहरात वीज बिघाड झाल्याने सहकाऱ्यांनी पाटील यांना दुरुस्तीच्या कामासाठी बोलावले. काम आटोपून ते पहाटे साडेतीन वाजता घरी परतले असता घराचा कडी-कोंडा तुटलेला आढळून आला. घरातील कपाटाचीही तोडफोड करण्यात आली होती.
चोरट्यांनी कपाटातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, तीन ग्रॅम वजनाचे झुमके जोड, पाच ग्रॅम वजनाच्या अंगठ्या आणि चार ग्रॅम वजनाचा वेलजोड, असे एकूण सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी श्यामकांत पाटील यांनी ४ ऑक्टोबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

