निम शिवारात हिंस्र प्राण्याचा धुमाकूळ; गोशाळेतील वासरावर हल्ला करून ठार वनविभागाच्या पाहणीत बिबट्या नसून तळस प्राण्याचे ठसे आढळले; शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन.

0

अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील निम शिवारात एका हिंस्र वन्यप्राण्याने गोशाळेतील तीन वर्षीय वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. संदीप जोशी यांच्या मालकीच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या आवारात ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

निम येथील शेतकरी सुदाम पाटील हे या शेतातील कामकाज पाहतात. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते शेतात आले असता त्यांना गोशाळेतील वासरू मृतावस्थेत आढळून आले. रात्रीच्या वेळी अज्ञात हिंस्र प्राण्याने वासरावर हल्ला केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पाहणी केली. याबाबत वनपाल गुलाब पिंजारी यांनी सांगितले की, वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ हा हिंस्र प्राणी असल्याचे पायाच्या ठशांवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, परिसरात बिबट्या असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच शेतकरी व पशुपालकांनी रात्रीच्या वेळी शेतात ये-जा करताना विशेष खबरदारी घ्यावी आणि जनावरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घ्यावी, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed