हेडावे ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाची महत्त्वाची पावले; सरपंच, ग्रामसेवकांसह आरोपींना नोटीस, BDO कडून अहवाल मागविला.

0

अमळनेर/आबिद शेख 


हेडावे (ता. अमळनेर) : हेडावे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फौजदारी अर्जावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भाऊराव पाटील यांनी दाखल केलेल्या Cri. M.A. No. 65/2025 (Ravindra Patil Vs. Manisha Patil & Ors.) या प्रकरणात न्यायालयाने संबंधित आरोपींना नोटीस बजावण्याचे तसेच अमळनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्याचे निर्देश दिले आहेत.


तक्रारदाराने ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या मागणीसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 मधील कलम 175(3) अंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.


न्यायालयाने आदेशात नमूद केल्यानुसार, लोकसेवकांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल विचारात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांना नोटीस बजावून तक्रारीतील आरोपांबाबत वस्तुस्थिती व परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोपी क्र. 1 ते 5 यांनाही नोटीस
न्यायालयाने प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 ते 5 यांना नोटीस बजावून तक्रारदाराने केलेल्या आरोपांबाबत त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. तसेच अर्जाची प्रत आणि त्यासोबत दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र नोटीससोबत देण्याचे निर्देश आदेशात आहेत.
BDO च्या अहवालाकडे लक्ष
आता अमळनेर गटविकास अधिकाऱ्यांकडून सादर होणाऱ्या अहवालाला या प्रकरणात महत्त्व प्राप्त झाले आहे. तक्रारीतील आरोप, उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधित ग्रामपंचायतीतील परिस्थिती याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित आरोपींचे म्हणणेही न्यायालयासमोर येणार आहे.
या टप्प्यावर न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचा अंतिम आदेश दिलेला नसून, BDO चा अहवाल आणि संबंधित आरोपींचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.
या आदेशामुळे हेडावे ग्रामपंचायतीशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाकडे ग्रामस्थांचे आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed