सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचा पुढाकार सेवा संकल्प व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने सेवा संकल्प अभियान व ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडले. यावेळी नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना नियमित आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षिततेची साधने वापरणे आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यविषयक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व कल्याणासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शहराच्या स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य सभापती, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, सर्व प्रभागांचे मुकादम, सफाई कर्मचारी, नगरपरिषद दवाखान्यातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. दरम्यान, दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने सेवा संकल्प अभियान व ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियानाच्या अंमलबजावणीत नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
— अमळनेर नगर परिषद, अमळनेर

