तासखेड्यात स्मशानभूमीला मिळणार हिरवाईचे नवे रूप; ग्रामस्थांनी लावली ५० हून अधिक देशी वृक्षांची रोपे गावकऱ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार; वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही घेतली.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तासखेडा येथील ग्रामस्थांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. गावातील स्मशानभूमी परिसरात ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करून या परिसराला हिरवेगार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेविका जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. माजी सरपंच प्रदीप पाटील, सरपंच कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला.

स्मशानभूमी परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ आणि बेल यांसारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता त्यांचे संगोपन करण्याचाही निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. झाडांना नियमित पाणी देता यावे यासाठी रावसाहेब पाटील आणि ए. के. पाटील यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या. तसेच प्रत्येक रोपाला ट्री गार्ड लावून त्याची निगा राखण्याची जबाबदारी गावकऱ्यांनी स्वीकारली.
स्मशानभूमी ही केवळ अंत्यसंस्काराची जागा न राहता ती स्वच्छ, शांत आणि हिरवीगार असावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पूर्वजांच्या स्मरणार्थ लावलेली झाडे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा अनमोल ठेवा देतील, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या मोहिमेत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परिसराची स्वच्छता, वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे आणि इतर कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून पूर्ण केली. याशिवाय भविष्यात स्मशानभूमीला कुंपण घालणे आणि नागरिकांसाठी बसण्याची बाके बसविण्याचाही संकल्प करण्यात आला.
यावेळी दिलीप बहिरम, संतोष बहिरम, सुनील पाटील, अभिमन पाटील, गुलाब पाटील, नागेश सोनार, मच्छिंद्र पाटील, निंबा पाटील, नाना पाटील, भारत पाटील, अनिल शिंदे, अनिल पाटील, बारकू पाटील, प्रमोद पाटील, आमोदे येथील भिवराव पाटील, संजय पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी आधार धनगर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
तासखेडा ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

