माणुसकीच्या दिव्यांनी उजळली गरिबांची दिवाळी; मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम एक हजारांहून अधिक गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप; १८ गावांमध्ये कपडे देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

0

अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे असताना दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाने साजरा व्हावा, या उदात्त हेतूने मंगळग्रह सेवा संस्थेने माणुसकीचा दीप प्रज्वलित केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील १८ हून अधिक गावांमध्ये ‘माणुसकीची दिवाळी’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून एक हजारांहून अधिक गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले.

दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून संस्थेच्या विश्वस्त आणि सेवेकऱ्यांनी ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदतीचा हात दिला. अनोरे, शिरूड, तासखेडे, आमोदे, गलवाडे, अमळगाव, खौशी, गंगापुरी, कन्हेरे, पातोंडा, लोण, मारवड, सात्री, कळमसरे, रत्नापिंप्री, दापोरी आणि कोळपिंप्री आदी गावांमध्ये फराळ किटचे वितरण करण्यात आले.

फराळ वाटपाबरोबरच काही गावांतील गरजू कुटुंबांना नवीन कपड्यांचे ड्रेस देण्यात आले, तर काही ठिकाणी वापरण्यायोग्य जुने कपडे वितरित करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद घेण्यापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर या मदतीमुळे समाधानाचे हास्य फुलले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे वर्षभर विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळावे, यासाठी दानशूर व्यक्तींनी फराळ, कपडे आणि अन्नधान्याच्या स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले होते.

या उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, बाळा पवार यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

स्वतःच्या आनंदात गरजवंतांनाही सहभागी करून घेण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून मंगळग्रह सेवा संस्थेने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed