अमळनेरमध्ये अग्निशमन दलाची तत्परता; दोन ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला! घराला लागलेल्या आगीत वृद्ध व्यक्तीची सुखरूप सुटका; फायरमनने आगीतून रोकडही वाचवली.

0

अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर  : शहरातील गांधीपुरा आणि सिंधी कॉलनी परिसरात सलग दोन ठिकाणी लागलेल्या आगींवर अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत तातडीने नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पहिली घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५७ वाजेच्या सुमारास गांधीपुरा भागात घडली. येथील दानिश स्क्रॅप या भंगार गोदामाला अचानक आग लागली. नगरसेवक श्रीराम चौधरी आणि नावेद शेख यांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

दुसरी घटना १२ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरात घडली. प्रकाशलाल लखुमल डिंगराई यांच्या घराला आग लागल्याची माहिती नगरसेवक भरत ललवाणी यांनी दूरध्वनीद्वारे अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. घरात एक वृद्ध व्यक्ती झोपलेली होती. घराचा दरवाजा उघडत नसल्याने काही काळ परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, जवानांनी दरवाजा उघडून वृद्ध व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले आणि घरातील आग पूर्णपणे विझवली.

या बचावकार्यादरम्यान फायरमन दिनेश बिऱ्हाडे यांनी विशेष धाडस दाखवत आगीत अडकलेली घरातील रोकड रक्कम सुरक्षित बाहेर काढली आणि ती घरमालकाच्या स्वाधीन केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आणि धाडसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले.

या दोन्ही घटनांमध्ये फायरमन दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, रफिक पठाण, सत्यन संदानशिव, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदानशिव आणि प्रसेनजीत सोनवणे यांनी मोलाची भूमिका बजावली.

संकटाच्या क्षणी धावून येणारे अग्निशमन दलाचे जवान केवळ आग विझवत नाहीत, तर प्रसंगी जीव वाचवून माणुसकीचेही दर्शन घडवतात. त्यांच्या तत्परतेमुळे दोन संभाव्य दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed