जपान जिन परिसरातील सुविधांसाठी राष्ट्रवादी आक्रमक औद्योगिक कर आकारणी रद्द करण्यासह रस्ते, गटार व पथदिव्यांची मागणी; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : अमळनेर शहरातील जपान जिन परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने नगरपरिषद प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रशासनाने १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष पाहणी करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली यांनी दिला.

जपान जिन परिसर निवासी क्षेत्र असतानाही येथे औद्योगिक दराने कर आकारणी होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टीसह विविध कर नियमितपणे वसूल केले जात असताना परिसरात रस्ते, गटारी आणि पथदिव्यांसारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात औद्योगिक दराने होणारी कर आकारणी रद्द करून निवासी दराने कर आकारणी करावी, परिसरातील कच्च्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे, सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी भूमिगत गटार योजना राबवावी, प्रत्येक आवश्यक ठिकाणी LED पथदिवे व हायमास्ट दिवे बसवावेत, तसेच आरक्षित मोकळ्या जागेवरील अतिक्रमण रोखून तेथे उद्यान व ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांवर चिखल व खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच गटारींच्या अभावामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिसरात पुरेशा पथदिव्यांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना, विशेषतः महिलांना, अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
२०२३ व २०२४ मध्येही प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती; मात्र अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी प्रशासनाने १५ दिवसांच्या आत जपान जिन परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे सैय्यद अजहर अली यांनी सांगितले.
यावेळी शराफत अली ढेकेदार, इकबाल लोहार, मोहसीन अली, इम्रान बागवान, सैय्यद आसिफ, शरूख शेख, शरूख पठाण, अबीद शेख, फौजन शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व जपान जिन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनाची प्रत आमदार अनिल भाईदास पाटील, नगररचना विभाग आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडेही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

