अमळनेरमध्ये वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी ४० हजारांची लाच; महावितरणचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; सहाय्यक अभियंत्यासह वरिष्ठ लिपिक व तंत्रज्ञाला रंगेहात पकडले.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर शहरात वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यात आले होते. या मीटरची तपासणी करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. घरातील विद्युत उपकरणांची पाहणी करून त्यांनी छायाचित्रे घेतली.

त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांना फोन करून कार्यालयाजवळ बोलावले. त्यांच्या घरातील वीज जोडणीमध्ये बेकायदेशीर वायर बायपास करून वीज वापर होत असल्याचे सांगितले. तसेच वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने पडताळणी केली असता, आरोपींनी तडजोडीअंती १४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यापैकी लाचेची रक्कम स्वीकारण्याची जबाबदारी सहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे यांच्याकडे देण्यात आल्याचे समोर आले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून १५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांना पकडले. या प्रकरणात वरिष्ठ लिपिक भरत कडू तायडे आणि तंत्रज्ञ रविंद्र छन्नू ताटीवाला यांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तिघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा आवताडे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
टीप : मूळ प्रेसनोटमधील काही आकडे व मजकूर अस्पष्ट असल्याने तक्रारीतील मूळ मागणी २० हजार रुपये आणि तडजोडीनंतरची मागणी व स्वीकारलेली रक्कम १५ हजार रुपये अशी उपलब्ध मजकुरानुसार बातमीत नमूद केली आहे.
