चुरशीच्या सामन्यांनी रंगली शालेय फुटबॉल स्पर्धा अमळनेर तालुक्यातील १७ संघांचा सहभाग; विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर आणि तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, मारवाड रोड, अमळनेर येथे करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील तब्बल १७ फुटबॉल संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेतील सामने अत्यंत अटीतटीचे आणि चुरशीचे झाले. अनेक सामने निर्धारित वेळेत बरोबरीत राहिल्याने अतिरिक्त वेळेत खेळवण्यात आले, तर काही सामन्यांचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लागला. त्यामुळे संपूर्ण क्रीडा संकुल परिसरात उत्साहाचे आणि क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा व खा. शि. मं.च्या विश्वस्त वसुंधराताई लाडगे, अमळनेर पोलीस अधिकारी व क्रिकेट अष्टपैलू खेळाडू समाधान गायकवाड, अर्बन बँकेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अभिषेक पाटील, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, पोलीस अधिकारी मयूर पाटील आणि तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष एस. पी. वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते फुटबॉल व मैदानाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर तसेच पंच अर्शद शेख, सागर चावरिया, अल्तमश सैय्यद, लकी चावरिया आणि जय जाधव यांचा बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध गुणवंत खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस अधिकारी समाधान गायकवाड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात यश संपादन करून शासकीय सेवेत दाखल व्हावे आणि देशसेवा करावी, असे आवाहन केले.
वसुंधराताई लाडगे यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देताना खेळाडू हा शिस्तप्रिय असतो, असे सांगितले. त्यांनी “हारी बाजी को जीतना हमें आता है…” हे गीत तालासुरात सादर करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील विजेते व उपविजेते
१४ वर्षे मुले :
विजेता – स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर
उपविजेता – सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ
१४ वर्षे मुली :
विजेता – ॲड. ललिता पाटील इंग्लिश नॅशनल स्कूल, अमळनेर
उपविजेता – स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर
१७ वर्षे मुले :
विजेता – सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ
उपविजेता – स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर
१७ वर्षे मुली :
विजेता – स्वामी विवेकानंद इंग्लिश नॅशनल स्कूल, अमळनेर
उपविजेता – ॲड. ललिता पाटील इंग्लिश नॅशनल स्कूल, अमळनेर
१९ वर्षे मुले :
विजेता – रॉयल उर्दू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुक्यातील गोकुळ बोरसे, सुनील करंदीकर, विनायक सूर्यवंशी, विनोद पाटील, योगेश पाटील, जय जाधव, सागर चावरिया, अर्शद शेख आणि दर्शन पाटील यांनी सहकार्य केले.
स्पर्धेतील विजयी संघांची दि. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान भुसावळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांना पुढील स्पर्धेसाठी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

