महिलांसाठी CSR निधीत स्वतंत्र हिस्सा द्या; अनिता भालेराव यांची मागणी.

0

अमळनेर/ आबिद शेख 


अमळनेर : महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी ‘व्हाईस ऑफ योजना दर्पण’ असोसिएशनच्या वतीने अनिता बापू भालेराव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

कंपनी कायदा २०१३ मधील कलम १३५ नुसार पात्र कंपन्यांना त्यांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. तसेच कायद्याच्या अनुसूची ७ मध्ये महिला सक्षमीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर CSR निधीमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र हिस्सा निश्चित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महिलांना स्वयंरोजगार, आर्थिक स्वावलंबन, कौशल्यविकास तसेच सामाजिक विकासाच्या विविध उपक्रमांसाठी CSR निधीतून आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी अमळनेरची टीम कार्यरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिलांच्या विकासासाठी CSR निधीचा प्रभावी वापर होऊन त्याचा थेट लाभ गरजू महिलांना मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी अनिता बापू भालेराव यांनी केली आहे.


या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, अमळनेर, तहसीलदार, अमळनेर तसेच मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांना माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed