अमळनेरात महात्मा बळीराजांचा जयघोष; पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘इडा, पीडा टळो, बळीचे राज्य येवो’चा निनाद.
अमळनेर /आबिद शेख 
अमळनेर : बलीप्रतिपदेचे औचित्य साधून अमळनेर शहरात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची भव्य आणि सवाद्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर, शेतकरी गीतांचा निनाद आणि बळीराजाच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय व मंगलमय वातावरणाने भारावून गेले होते. मिरवणुकीच्या समारोपानंतर बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विधिवत पूजन करून अभिवादन केले.

मिरवणुकीचा प्रारंभ पटवारी कॉलनी येथून करण्यात आला. मांडळ येथील ज्येष्ठ शेतकरी पंढरीनाथ पाटील आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर निकम यांच्या हस्ते बैलगाडी व नांगराचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगरसेवक श्याम पाटील, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कैलास पाटील, अरुण देशमुख, अशोक बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी महात्मा बळीराजांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचे विचार विशद केले. अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर शेतकरी गीतांच्या सुरावटी आणि बँडच्या गजरात मिरवणुकीने शहरातील मराठा कॉलनी, शिरूड नाका, स्वामी समर्थ मंदिर, विजय मारुती, धुळे रोडमार्गे महाराणा प्रताप चौक असा प्रवास करत फुलांनी सजवलेल्या बळीराजा स्मारकाकडे प्रस्थान केले.
मिरवणुकीत सजवलेल्या वाहनावर महात्मा बळीराजांची भव्य प्रतिमा विराजमान होती. तसेच भव्य नांगर आणि बाल शिवराय व राजमाता जिजाऊ यांची आकर्षक सजावट असलेली बैलगाडी नागरिकांचे विशेष आकर्षण ठरली. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी बळीराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेत पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
स्मारकस्थळी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते विधिवत बळीराजा पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन केले. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने पुढे यावे, असे मत व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना बलीप्रतिपदेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले, तर उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी आभार मानले. यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शेतकी संघाचे संचालक संजय पाटील, विक्रांत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, डी. एम. पाटील, महेश पाटील, वाल्मीक पाटील, एल. टी. पाटील, सयाजीराव पाटील, विवेक पाटील, मराठा समाज मंडळाचे शेखर पाटील, दत्तू शामराव पाटील, नगरसेवक सचिन पाटील, संजय पाटील, योगेश शिंदे, भरत बोरसे, बाळू संतोष पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महात्मा बळीराजांच्या विचारांचे स्मरण, शेतकरी एकजुटीचा संदेश आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही मिरवणूक अमळनेरकरांसाठी विशेष आकर्षण ठरली. मंगलमय वातावरणात आणि बळीराजाच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

