अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; लिफ्ट बंद पडून कर्मचारी अडकला वारंवार बिघाड होऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष? नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर नगरपरिषद कार्यालयातील लिफ्ट मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास अचानक बंद पडल्याने एक कर्मचारी काही काळ लिफ्टमध्ये अडकला. या घटनेमुळे नगरपरिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

 

लिफ्ट अचानक बंद पडताच अडकलेल्या कर्मचाऱ्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर प्रयत्नांना यश आले आणि लिफ्टचा दरवाजा उघडून कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे नगरपरिषद कार्यालयातील लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नगरपरिषद कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येत असतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच आजारी आणि दिव्यांग नागरिकांचाही समावेश असतो. अशा परिस्थितीत लिफ्टमध्ये एखादा नागरिक अडकला आणि त्यावेळी गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


वारंवार बिघाड, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष?
नगरपरिषद कार्यालयातील ही लिफ्ट यापूर्वीही अनेकदा बंद पडल्याच्या तक्रारी असल्याचे सांगितले जात आहे. वारंवार तांत्रिक बिघाड होत असतानाही लिफ्टची कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा सखोल तांत्रिक तपासणी करण्यात येत नसल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लिफ्टची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी, तसेच लिफ्ट वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच तिचा वापर सुरू ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed