बँक ग्राहकांसाठी दिलासा; रविवारीही सरकारी बँका सुरू २७ सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील व ग्रामीण बँकांचे कामकाज सुरू; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संप.

0

24 प्राईम न्यूज 24 Spe 2026


नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बँक ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. सलग पाच दिवस बँकिंग सेवा प्रभावित होऊ नयेत, यासाठी रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. मंगळवारी उपमुख्य कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत झालेली तडजोडीची बैठक निष्फळ ठरल्यानंतर संघटनांनी संपाचा निर्णय कायम ठेवला आहे.

सलग पाच दिवस बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता

२६ सप्टेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँकांना नियमित सुट्टी आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संप असल्याने बँकिंग सेवा सलग पाच दिवस प्रभावित होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी वित्त मंत्रालयाने २३ सप्टेंबर रोजी आदेश जारी करून २७ सप्टेंबरचा रविवार हा बँकांसाठी कामकाजाचा दिवस घोषित केला आहे.
आरबीआयचीही मंजुरी.


वित्त मंत्रालयाच्या निर्णयाला भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे रविवारी बँकांच्या नियमित शाखांसोबतच संबंधित कार्यालये, एटीएमशी जोडलेल्या शाखा आणि करन्सी चेस्टदेखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहणार आहेत.
संप सुरू होण्यापूर्वी नागरिकांना रोख रक्कम, धनादेश, जमा-उचल आणि इतर आवश्यक बँकिंग व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळणार असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed