रोटरी क्लबचा सामाजिक उपक्रम; एड्सग्रस्त बालकांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद चार वर्षांपासून नियमित प्रोटीन किटचे वाटप; मुलींना ६० फ्रॉक्सचे वितरण.

0

अमळनेर /आबिद शेख 

अमळनेर,  दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा आणि एड्ससह जीवन जगणाऱ्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने रोटरी क्लब अमळनेरतर्फे सामाजिक बांधिलकी जपत विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बालकांसह रुग्णांना दिवाळी फराळ, प्रोटीन किट आणि सकस आहाराचे पाकीट वितरित करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. हा कार्यक्रम रोटरी हॉल येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटे. मकसूद बोहरी यांनी उपक्रमाची माहिती दिली. बहुउद्देशीय आधार संस्थेच्या प्रमुख डॉ. भारतीताई पाटील यांच्या प्रेरणेतून आधार संस्था आणि अंकुर फाउंडेशन यांच्या सहकार्याने रोटरी क्लब गेल्या चार वर्षांपासून दर महिन्याला नियमितपणे प्रोटीन किटचे वाटप करीत आहे. एड्ससह जीवन जगणाऱ्या बालकांचे आरोग्य आणि शारीरिक सुदृढता टिकून राहावी, यासाठी हा उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या बालकांच्या आनंदात भर घालण्यासाठी विशेष फराळ वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात सौ. मेहराज हुसेन बोहरी यांनी स्वतः शिवलेल्या ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ उपक्रमांतर्गत मुलींसाठी ६० फ्रॉक्सचे वितरण केले. या उपक्रमामुळे मुलींच्या चेहऱ्यावरही आनंद झळकला.

स्वादिष्ट नमकीनचे प्रमुख रोटे. विजय भाऊ पाटील यांच्यातर्फे दिवाळी फराळाची पाकिटे, तर रोटे. प्रतीक खंडेरिया यांच्यातर्फे प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, रोटे. चेलाराम सैनानी, रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक खंडेरिया, बहुउद्देशीय आधार संस्थेच्या डॉ. भारतीताई पाटील, रेणुका प्रसाद ताई तसेच आधार संस्था आणि अंकुर फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

समाजातील गरजू घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी रोटरी क्लबने राबविलेला हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा सुंदर संदेश देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed