सेवा संकल्प अभियानातून महावितरणच्या योजनांचा लाभ घ्या अमळनेर तालुक्यात बैठक; सौर ऊर्जा योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या आमदार अनिल पाटील यांच्या सूचना.
अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध सौर ऊर्जा योजनांची माहिती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस महावितरणचे धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता सोनगिरे, अमळनेर शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, धरणगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता देवेंद्र वाणी तसेच अमळनेर ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता भावसार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (स्मार्ट) आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. अमळनेर तहसील कार्यालयात १७ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
पीएम सूर्यघर योजनेत अनुदानाचा लाभ
३ किलोवॅटपर्यंत सौर यंत्रणा बसविणाऱ्या ग्राहकांना अंदाजे ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज खर्चात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर
मागील वर्षभरात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे. १ किलोवॅट क्षमतेच्या सोलरसाठी खुल्या व ओबीसी प्रवर्गातील ग्राहकांना अंदाजे १० हजार रुपये, एससी व एसटी प्रवर्गासाठी सुमारे ५ हजार रुपये, तर बीपीएल ग्राहकांना केवळ २,५०० रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून भरली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाची सुविधा
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना ५ टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप संच उपलब्ध होणार आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपी क्षमतेचे पंप उपलब्ध असून, पाच वर्षांची दुरुस्ती हमी व विम्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले.
या योजनांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर करता येणार असून वीजबिल आणि लोडशेडिंगच्या समस्येतूनही दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
इच्छुक नागरिकांनी अमळनेर तहसील कार्यालयातील महावितरणच्या सेवा सेतू स्टॉलवर किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

