बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; नऊ विभागीय मंडळांमार्फत होणार परीक्षा.

0

24 प्राईम न्यूज 8 Nov 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे

.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाशी संबंधित परीक्षा १० जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान घेतल्या जाणार आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. तसेच २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन आयोजित करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट देऊन

परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक तपासावे. सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकावर अवलंबून न राहता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकाचीच खात्री करावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed