प्रताप हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मितीचा अनोखा उपक्रम हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांनी एकत्र येत दिला सामाजिक एकात्मतेचा संदेश; शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्रताप हायस्कूलमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध रंगांचे आणि आकर्षक आकाशकंदील तयार करून कलात्मकतेचा सुंदर आविष्कार घडविला.

शाळेचे चेअरमन सीए नीरज अग्रवाल आणि मुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे आकाशकंदील तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. कला शिक्षक डी. एन. पालवे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करत आकाशकंदील निर्मितीचे तंत्र शिकविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्वतः आकाशकंदील तयार केले.

या उपक्रमातून धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकात्मतेचेही दर्शन घडले. हिंदू-मुस्लिम धर्मातील विद्यार्थ्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्रितपणे या कार्यशाळेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शिक्षकांनीही स्वतः आकाशकंदील तयार केले.
शिक्षक निखिल पाटील, सचिन अहिरे, कृष्णा कोळी, सुहास खांजोडककर, जयश्री पाटील, नम्रता दोरकर यांच्यासह लिपिक सागर पवार आणि शिपाई प्रसाद गोसावी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील दिवाळीनिमित्त शाळेच्या परिसरात लावण्यात आले असून, त्यांच्या रंगीबेरंगी प्रकाशाने शाळेचे वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली.
फटाक्यांचा अनावश्यक वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा आणि निसर्गाशी मैत्री जपण्याचा संदेशही देण्यात आला.
आकाशकंदील निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, स्वावलंबन, सहकार्याची भावना आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व रुजविणारा हा उपक्रम आनंददायी ठरला.

