गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च संवेदनशील भागात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन; ९ अधिकारी, ९५ अंमलदार व ११८ होमगार्ड सहभागी.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : गणेशोत्सव तसेच अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रूट मार्च काढण्यात आला. सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत शहरातील विविध संवेदनशील भागातून हा रूट मार्च पार पडला.

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान-कसाली डीपी, वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक तसेच गांधलीपुरा पोलीस चौकी परिसरातून पोलिसांनी संचलन केले.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या रूट मार्चमध्ये ९ पोलीस अधिकारी, ९५ पोलीस अंमलदार, १ आरसीपी, १ स्ट्रायकिंग फोर्स आणि ११८ होमगार्ड सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्जता दाखविली आहे.

