अमळनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १२० मल्लांचा सहभाग; चुरशीच्या लढतींनी रंगला आखाडा.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तब्बल १२० मल्लांनी सहभाग नोंदवल्याने संपूर्ण क्रीडा संकुलात कुस्तीच्या चुरशीच्या लढती आणि थरार पाहायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर पोलीस विभागाच्या PSI कविता ठाणगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमळनेर कुस्ती महासंघाचे बाळूभाऊ पाटील, माजी नगरसेवक प्रताप आबा पाटील, दामिनी पोलीस विभागाच्या प्रमुख नम्रता जरे, संजय पाटील भुतबापू, पैलवान संजय भिला पाटील तसेच क्रीडा अध्यक्ष एस.पी. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेतील सामने पंच महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. समितीचे सदस्य के.आर. बाविस्कर, प्रा. प्रितेश तुरणकर, बापूराव सांगोरे, आर.ए. घुगे, स्वप्नील पाटील व गोकुळ बोरसे यांनी स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी एच.आर. बाविस्कर सर, अरविंद मोरे सर, रविंद्र भोई, योगराज चौधरी, पवन पाटील, भावेश कोळी यांच्यासह क्रीडाप्रेमी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या अमळनेर तालुक्यातील सर्व मल्लांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय व पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

