वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सभापती अशोक पाटील यांचा सामाजिक उपक्रम; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांची मदत दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाढदिवस साधेपणाने साजरा; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : राज्यासह अमळनेर तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकट लक्षात घेऊन अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आगामी काळातील संभाव्य अडचणींची जाणीव ठेवून सभापती अशोक पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच कार्यकर्त्यांनी लावलेले वाढदिवसाचे बॅनर काढून टाकावेत, अशा सूचना दिल्या होत्या.
बाजार समितीतील शेतकरी, कर्मचारी, हमाल-मापाडी आणि व्यापारी बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्याची तयारी होती. मात्र, दुष्काळग्रस्त परिस्थितीत उत्सवापेक्षा मदतीला प्राधान्य देत त्यांनी हा निर्णय घेतला.
यानिमित्ताने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन सभापती अशोक पाटील यांनी संचालक समाधान धनगर, सचिव डॉ. उन्मेष राठोड, सहसचिव सुनील पाटील, योगेश महाजन, अशोक वाघ तसेच अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांच्या उपस्थितीत ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

याशिवाय लोणसह ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दुष्काळाचे चटके बसू नयेत आणि त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने सभापती अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा अशोक पाटील यांचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमातून समाजापुढे सेवाभावाचा आणि सामाजिक जाणीवेचा आदर्श निर्माण झाला असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

