खेडीढोक येथे भावना मैराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा.
अमळनेर/ आबिद शेख 
खेडीढोक, ता. पारोळा : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श डी. एल. सोशल फाउंडेशनच्या संचालिका सौ. भावना समाधान मैराळे यांनी घालून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खेडीढोक येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वाटप करून शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवेत जाण्याची जिद्द आणि स्वप्ने असली, तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा आवश्यक अभ्यास साहित्य उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत व्हावी, या उद्देशाने पुस्तक वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी सौ. भावना मैराळे यांचे पती डॉ. समाधान मैराळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत आपले ध्येय निश्चित करावे, नियमित अभ्यास आणि वाचनाची सवय जोपासावी, तसेच अपयशाने खचून न जाता जिद्द व चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवावेत, असे मार्गदर्शन डॉ. समाधान मैराळे यांनी केले.

वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणारे साहित्य देण्याचा हा उपक्रम ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळण्यास मदत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी खेडीढोक येथील गणेश पाटील, गोरख भिल, शुभम पाटील, कुलदीप पाटील, उत्कर्ष भदाणे यांच्यासह स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे खेडीढोक परिसरातून कौतुक होत आहे.

