जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात विजेत्या खेळाडूंची नाशिक येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड.
नंदुरबार/ प्रतिनिधी

नंदुरबार : बादशहा नगर उर्दू हायस्कूलच्या सभागृहात जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार आणि नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली.
जिल्ह्यातील विविध शाळांमधून आलेल्या मुला-मुलींनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तायक्वांदोच्या विविध प्रकारांतील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रवेज खान करामत भाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक चेतन वडवी, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख साबीर, क्रीडा अधिकारी ओंकार जाधव, एमआयएम जिल्हाध्यक्ष फरहत हुसेन, फारुख पठाण, साजिद बागवान, यासीन मन्सूरी, इमरान खान, शेख असलम, शाजेब सय्यद, डॉ. निसार मिर्झा, जरीफ खान, अर्षद अली, मदरसा ग्रुपचे जावेद इनामदार, जाकीर रंगरेज, राहुल खैरनार, जसवंत परदेशी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रवेज खान यांनी तायक्वांदो हा आत्मसंरक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त खेळ असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य ठेवून पुढील स्तरावरही उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
फारुख पठाण यांनी विद्यार्थ्यांनी खेळासोबत अभ्यासालाही महत्त्व द्यावे, तसेच योग्य आहार व नियमित सरावावर भर द्यावा, असे आवाहन केले. माजी खेळाडू फरहत हुसेन यांनीही खेळाडूंनी सातत्याने सराव करून तायक्वांदोचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावेद बागवान यांनी केले. स्पर्धेतील पंच म्हणून साहिल शेख, मोईन शेख, शाहिद मिया, साद पठाण, सुफियान काझी, हमजा मन्सूरी आणि फरहान कादरी यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हैदर जाफर यांनी केले.
नाशिकच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांची दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
