LPG सिलिंडर बुकिंगसाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्तीचे १ ऑक्टोबर २०२६ पासून नवा नियम; प्रमाणीकरण न केल्यास रिफिल बुकिंग व सबसिडीवर परिणाम.

0

अमळनेर /आबिद शेख 

 

घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून नियमानुसार किरकोळ विक्री किमतीत तसेच सबसिडीसह एलपीजी सिलिंडर रिफिल बुक करण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत.

 


एलपीजी सबसिडीचा लाभ केवळ पात्र आणि गरजू ग्राहकांपर्यंत पोहोचावा, तसेच बनावट किंवा अपात्र गॅस कनेक्शनच्या माध्यमातून होणारा गैरवापर रोखता यावा, या उद्देशाने ही प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखणे आणि एलपीजी वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करणे, हाही या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशभरात सुरू असलेल्या या मोहिमेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत २७.४३ कोटी ग्राहकांनी म्हणजेच सुमारे ८९.१ टक्के ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. ज्या ग्राहकांचे प्रमाणीकरण आधीच पूर्ण झाले आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. त्यांची सिलिंडर रिफिल सेवा आणि लागू असलेला अनुदानाचा लाभ पूर्वीप्रमाणे सुरू राहील.
मात्र, ज्या ग्राहकांनी अद्याप आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी १ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच त्यांना लागू नियमांनुसार सबसिडीसह सिलिंडर बुक करता येणार आहे.
प्रमाणीकरणासाठी दोन सोपे पर्याय
१. डिलिव्हरीच्या वेळी प्रमाणीकरण :
सिलिंडरची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या ओएमसीच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून ग्राहकांचे ऑन-द-स्पॉट बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येणार आहे.
२. गॅस एजन्सीत प्रमाणीकरण :
ग्राहक आपल्या जवळच्या एलपीजी वितरक कार्यालयात किंवा गॅस एजन्सीच्या शोरूममध्ये जाऊन आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
त्यामुळे अद्याप प्रमाणीकरण न केलेल्या एलपीजी ग्राहकांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed