अमळनेर रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश; विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : मेरा युवा भारत, जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा पंधरवडा’निमित्त अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या अभियानादरम्यान समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवासी व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचरा कचरापेटीतच टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले.

‘स्वच्छ रेल्वे स्थानक – स्वच्छ अमळनेर’ या घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. पथनाट्यास प्रवासी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अमळनेर रेल्वे स्थानकाचे वाणिज्य निरीक्षक रवि पांडे व स्थानक व्यवस्थापक अनिल बी. शिंदे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. अनिता खेडकर आणि प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. मेरा युवा भारत, अमळनेरचे तालुका समन्वयक सागर कोळी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पथनाट्यात तेजस्विनी, कीर्ती, रत्ना, जान्हवी, भावना, अनुजा, मयुरी आणि क्रिस केदार यांनी सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविला.

