ढेकू रस्त्यावरही बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : शहरालगतच्या ढेकू रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश देसले यांच्या शेताजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसून आला. नागरिकांनी लांबून त्याचा फोटो काढला. त्यानंतर बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तो ढेकू व गलवाडे रस्त्याच्या दिशेने पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच गणेश देसले यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी वन विभागाचे वनपाल गुलाब पिंजारी यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनपाल पिंजारी हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान, शहराच्या जवळच बिबट्याचा वावर आढळून आल्याने पोलीस वसाहतीसह ढेकू रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही अमळनेर तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने या परिसरात पाहणी करून बिबट्याचा शोध घ्यावा आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed