अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरात २१ सप्टेंबरला श्री मंगळ जन्मोत्सवाचा भव्य सोहळा पहाटे पंचामृत अभिषेक, ५६ भोगाचा नैवेद्य आणि महाभोमयागाचे आयोजन; भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
अमळनेर /आबिद शेख


जन्मोत्सवानिमित्त पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर विशेष पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ६ वाजता आकर्षक सजावट केलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा होईल. सकाळी ७ वाजता मंदिरातील जुने ध्वज उतरवून विधिवत नवीन ध्वज लावण्यात येणार आहेत.

यानंतर श्री मंगळग्रह देवांना ५६ भोगाचा नैवेद्य अर्पण केला जाणार असून, त्यानंतर हा नैवेद्य भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात वितरित करण्यात येईल. तसेच रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे, यासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराच्या वैशिष्ट्यांमुळे भाविकांसाठी विशेष आकर्षण
अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती असल्याचा मंदिर संस्थेचा दावा आहे. त्याचबरोबर श्री भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील मूर्ती आणि श्री पंचमुखी हनुमानजींची मूर्तीही येथे आहे. मंदिर परिसरात भगवान श्री गुरुदत्त व माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित मंदिर तसेच भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित मंदिर असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
जलाशय आणि वनराईने नटलेल्या मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे. विनम्रता, स्वच्छता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर सेवा कार्य सुरू असल्याचे मंदिर संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून श्री मंगळग्रह देवांचे दर्शन, जन्मोत्सव सोहळा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

