दुष्काळ निवारणासाठी यंत्रणांनी तत्परतेने कामाला लागावे; आमदार अनिल पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश चार वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा; प्रत्येक विभागाने पर्यायी नियोजन ठेवण्याचे आवाहन.
अमळनेर : आबिद शेख 
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे. कामातील तांत्रिक अडचणी दूर करून रखडलेली कामे मार्गी लावावीत आणि केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश आमदार अनिलदादा पाटील यांनी दिले.

अमळनेर येथील इंदिरा भवनात शनिवारी आयोजित तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तालुक्यातील सुमारे १०० पाणीपुरवठा योजना असून, त्यापैकी अनेक योजनांची कामे चार वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. तांत्रिक अडचणी बाजूला ठेवून या योजना तातडीने सुरू कराव्यात. ठेकेदार कामे पूर्ण करीत नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी. नाला खोलीकरणाची कामे त्वरित हाती घ्यावीत. रॉयल्टीच्या बाबतीत आवश्यक ती लवचिकता ठेवून कामांना गती द्यावी. धरणाच्या ठेकेदाराला मुरूम आवश्यक असल्यास त्याने नाला खोलीकरणाचे काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
याशिवाय वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. गुरेढोरे, वीजतारा आणि इतर साहित्याच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी. अशा प्रकारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करावा. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासून नागरिकांना सुरक्षित पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाने पर्यायी नियोजन अर्थात बी-प्लॅन तयार ठेवावा, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी मयूर बंगलाळे यांनी जून महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तहसीलदार डॉ. उमा हेकरटे यांनी दुष्काळी पंचनाम्यांचा अहवाल व अनुदानासंदर्भातील माहिती सादर केली. गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी जलतारा प्रकल्प, चारा लागवड आणि पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहरासाठी पाण्याचे रोटेशन राखीव ठेवले असून, सध्याचा पाणीसाठा १५ डिसेंबरपर्यंत पुरेल, अशी माहिती दिली.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता कौस्तुभ पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंवर, मनरेगाचे किशोर ठाकरे, तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे, भूमी अभिलेख उपअधीक्षक स्मिता गावित, पाडळसे धरणाचे उपविभागीय अभियंता यशोदीप कडलग, एपीआय गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक साजिद मन्सुरी यांच्यासह आरोग्य, महिला व बालविकास, पशुवैद्यकीय आणि वीज वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विविध विभागांच्या वतीने शासनाच्या योजनांची माहिती तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे अहवाल सादर करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

