अव्वाच्या सव्वा घरपट्टीविरोधात अमळनेरकर एकवटणार; रविवारी शिवाजी महाराज गार्डनमध्ये बैठक.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेने नगररचना विभागामार्फत नव्याने मालमत्ता कर आकारणीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीनंतर घरपट्टीच्या वाढीव आकारणीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कोअर प्रोजेक्ट कंपनी, अमरावती यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मालमत्तांच्या मोजमापावर आधारित कर आकारणी अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी नगररचना विभागामार्फत नव्या मालमत्ता कर आकारणीसंदर्भात सुनावणी घेण्यात आली. मात्र, खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या मोजमापात त्रुटी राहिल्याने अनेक मालमत्तांवर अवाजवी कर आकारणी झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही वाढीव घरपट्टी कमी किंवा रद्द करण्यासाठी नागरिकांनी संघटितपणे लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, पोस्ट ऑफिसजवळ, अमळनेर येथे नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत वाढीव घरपट्टी, मोजमापातील त्रुटी, कर आकारणीची पद्धत तसेच पुढील आंदोलनाची दिशा याबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार आहे.

या बैठकीस सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच अमळनेर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed