राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरच्या नूतन भोईच्या क्रीडा प्रवासाचा गौरव इनलाइन स्केटिंग, आईस हॉकी व शूटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर ठसा; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याचे ध्येय.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहराचे नाव क्रीडा विश्वात उज्ज्वल करणाऱ्या भोईवाडा येथील गुणी राष्ट्रीय खेळाडू नूतन किशोर भोई हिच्या उल्लेखनीय यशाचा व प्रेरणादायी क्रीडा प्रवासाचा विशेष गौरव करण्यात येत आहे. विविध राष्ट्रीय व विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत नूतनने अमळनेर तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.

नूतन भोई हिने आपल्या अष्टपैलू क्रीडा कौशल्याच्या जोरावर विविध खेळांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत नाशिक विभागीय स्तरावर उत्कृष्ट अचूकता व एकाग्रतेचे प्रदर्शन करत तिने प्रभावी कामगिरी केली आहे.
तसेच, ६३ व्या नॅशनल इनलाइन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत नूतनने आपल्या वेगवान व कौशल्यपूर्ण खेळाची छाप पाडली. याशिवाय IHAI नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप २०२६ मध्ये डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
ग्रामीण खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळाव्यात
आपल्या क्रीडा प्रवासाविषयी बोलताना नूतन भोई म्हणाली की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि जिद्द असूनही आर्थिक अडचणींमुळे अनेकांची स्वप्ने अपुरी राहतात.
ती म्हणाली, “मी इनलाइन स्केटिंग, आईस हॉकी आणि रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे. मात्र, यासाठी महागडे क्रीडा साहित्य आणि प्रवासाचा खर्च मोठा असतो. शासनाने ग्रामीण खेळाडूंसाठी नियमित शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, दर्जेदार क्रीडा साहित्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत. अमळनेरसारख्या भागात आधुनिक क्रीडा संकुले उभारल्यास आमच्यासारखे ग्रामीण खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत मजल मारून देशाचा तिरंगा उंचावू शकतील.”
भोईवाडा, अमळनेर येथील रहिवासी असलेल्या नूतन किशोर भोई हिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरवासीयांसह क्रीडाप्रेमींनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील क्रीडा प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
नूतन भोईसारख्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना योग्य सुविधा, आर्थिक पाठबळ आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अमळनेरच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

